“हरवलेली मैत्रीण”- भाग ३

“हरवलेली मैत्रीण”- भाग ३
संथ वाहत्या पाण्यात एक दगड टाकल्यावर बराच वेळ तरंग उठतात ना?
माझंही तसंच काहीसं झालं होतं…
अश्विनीचा शोध घेण्यासाठी फेसबुक आठ दिवस उलटपालट केलं होतंच मी..
आता चार अश्विनींना मेसेंजरवर मेसेज करुन माझी अजूनच गंमत झाली होती.
सुरवातीचे दोन तीन दिवस दर तासांनी मेसेंजर चेक करत होतो.
पण कसचं काय..?
नेहमी येणारे दोन गुड माॕर्नींग मेसेज दात काढून हसायचे मला..
शेवटी तिस-या दिवसानंतर मेसेंजर उघडणेच बंद करुन टाकलं..
चिडचिड झाली माझी..
दिस इज नाॕट फेअर यार…!
तीस वर्षांनी या मुलीला मी शोध शोध शोधतोय..
पण तिला काय पडलीय..
काही ईन्ट्यूटन…टेलेपथी..आहे की नाही..??
जगाच्या कुठल्या कोप-यात आहे कोणास ठाउक..
आहे का तिला काही आठवण माझी..?
असा सर्व त्रागा अश्विनीवर (मनातच) काढून मग मी जरा शांत झालो..
कामाच्या गडबडीत एक दिवस असाच गेला..
पाचव्या दिवशी सकाळी मेसेंजर उघडला तर एक अनोळखी मेसेज दिसला..
का कोणास ठाउक पण अचानक धडधड वाढली..
मेसेज एका अश्विनी साठेचाच होता..पण त्यात लिहीलं होतं
‘माफ करा माझे सर्व शिक्षण अंमळनेरला झाले..मिरजला मी नव्हते कधीच..’
फुस्स..!! वन डाउन…थ्री टू गो…!
गंमत म्हणजे त्याच रात्री मेसेंजर उघडला अन…
अजून एक अनोळखी मेसेज..
धडधड…
‘हाय…! अहो तुम्ही तुमच्या चाईल्डहूड स्विटहार्ट ला शोधताय का?
पण मी तुमची अश्विनी नाही हो..असते तर छान वाटल असतं..
तीस वर्षांनी कुणी तरी आपल्याला शोधतय ही कल्पनाच किती भारी आहे..
पण मी बाॕर्न अँड ब्राॕट अप मुंबईची म्हणजे दादरची आहे..
तुम्हाला ‘तुमची अश्विनी’ लवकर सापडो ही शुभेच्छा.
भेटली की मलाही कळवा..!’
“आयला…!! डेंजरच बाई आहे…” मी विचार केला
एका साध्या सरळ प्रश्नाच्या सूतावरुन बाईंनी कल्पनेचा स्वर्ग गाठला होता..
‘भेटली की मला कळवा’ म्हणे..
पिक्चरची स्टोरी आहे का..?
एनीवेज…चला.!! टू डाउन…टू मोअर टू गो..!!
माझा पडलेला चेहरा बघून बायकोने विचरलं..’बरय ना रे तुला..?’
‘आपल्याला काय धाड भरलीय..’ असे म्हणत मी विषय बदलला.
गेले काही दिवस आपला नवरा चक्रम सारखा वागतोय हे तिच्या लक्षात आलं होतं.
पण ती काही बोलली नाही..
पुन्हा दोन दिवस मेसेंजर उघडलाच नाही..
इच्छाच झाली नाही..
रविवारी सकाळी उशीरा उठलो..
चहा घेत घेत..व्हाटसप..मग फेसबुक चाळलं..
शेवटी मेसेंजर उघडल..अगदी मेकॕनिकली..
हॕपी संडे आणी गुड माॕर्नींग अशा दोन मेसेजबरोबर एक तिसरा मेसेजही होता..
मी तो शांतपणे उघडला..
त्यात एवढच लिहीलं होतं..
“सख्या..
तीन दशकांनी
देतोय हाक..
मधली ओळ..
तिसरा बाक…
एवढे शब्द वाचले..आणि…मी जागेवरच थिजलो
जे वाटलं ते शब्दात व्यक्त करता येण्यासारखं नाही..
गळा भरुन आला..
डोळे दगा देणार असे वाटलं तसा पटकन उठलो आणि बेडरुममधे आलो..
दरवाजा पुढे करुन घेतला…
अन अश्रुंना वाट करुन दिली..
फायनली…!!
अश्विनी मला तीस वर्षांनी सापडली होती.
ओल्या डोळ्यांनीच तिचा फोटो पाहिला.. तिचा प्रोफाईल वाचला..
डाॕ.अश्विनी करमरकर-साठे
जर्मनीत फ्रँकफूर्टमधे राहतेय.
ENT Specialist आहे..
आणि फ्रँकफर्टमधल्या सर्वात मोठं हाॕस्पीटल मधे कार्यरत आहे..
युनीव्हर्सटी हाॕस्पीटल फ्रँकफर्ट मधे ती ENT हेड आॕफ डिपार्टमेंट आहे..
तिचा नवरा आभास करमरकर त्याच हाॕस्पिटलमधे कार्डियाक सर्जन आहे..
मी डोळे पुसले..
तिने पुढे एक मेसेजही लिहीला होता मला …
“प्रिय सुनील…
गडबडीत आहे..तुला पुन्हा सविस्तर लिहीनच..!
आता फक्त एवढच सांगते..
इथे मी लढते आहे एका विषाणुशी..
आणि मृत्युशीही..रोज…
एक एक जीव वाचवण्यासाठीची ही न संपणारी लढाई आहे..
पण हे अखंड बळ आलंय कुठून माझ्यात…?
तुझ्याकडूनच..!
वयाच्या दहाव्या वर्षी एका स्वत्व हरवलेल्या मुलीला लढण्याची उमेद दिलीस तू..
तुला कल्पना नाहीय किती मोठा लाइफचेंजर होता तो क्षण माझ्यासाठी..
माझ्या चेह-यावरचा व्रण सर्जरी करुन खूप नंतर गेला..
मनावरचा व्रण मात्र तूच काढून टाकला होतास तेंव्हा..
असं समजू नको की मी एवढ्या वर्षात मी तुझी कधी आठवण काढली नाही..
कारण आठवण काढायला मी तुला कधी विसरलेच नाही..
काळजी घे..!
तुझी सखी,
अश्विनी
बेडरुमचे दार उघडले..
मागून आलेल्या बायकोने माझा भिजलेला मोबाईल हातातून घेतला..
तो मेसेज वाचला..
मग स्वतःचे डोळे पुसत माझ्या मिठीत शिरली..
समाप्त
© सुनील गोबुरे

About Sunil Gobure 13 Articles
I am a Banking Professional, working currently with ICICI Bank Ltd. Basically an Engineer by education, I entered into Banking field in middle of my career. Since 2006 I am working with ICICI Bank. Currently posted at Sangli, taking care of Kolhapur Region as Regional Sales Manager for Business Loans Group.