“हरवलेली मैत्रीण” – भाग १

Sunil Gobure

Admin · 20 April

#LockdownDiaries

“हरवलेली मैत्रीण” भाग १

लाॕकडाउन सुरु झाल्यापासून हे फॕड चालू झालय..
लोक उठसूठ जुने फोटो टाकताहेत.फेबु आणि व्हाट्सअपवर..
जुन्या ट्रिप्स, मुंज, साखरपुडे, लग्न अन हनीमुन सुद्धा..

मी दोन शाळांत शिकलो त्याचे दोन व्हाट्सअप गृप आहेत..
सहावीपर्यंत न्यू इंग्लीश स्कूल आणि पुढे दहावीपर्यंत विद्या मंदिर..
दोन्ही गृपमधे आपण एकदम सक्रीय कार्यकर्ते..

लाॕकडाउनच्या पहिल्या आठवड्यात एक कृष्णधवल फोटो न्यू इंग्लीश स्कूल गृपवर झळकला..
तो आमच्या 6th B या क्लासचा गृप फोटो होतो..
बस्स..फोटो येताच धडाधड कमेंट्स येउ लागल्या..

‘अरे तिस-या रांगेत डावीकडून तिसरा उभा आहे मी.., विन्या आणि पद्याच्यामधे’ इती पत्या जगताप

‘शेवटच्या रांगेत उजवीकडून दुसरा चष्मीस रव्या आणि त्याशेजारी मी आणि
सुध-या..’ इती गजा कुंभार

‘चौथ्या रांगेत एकदम डावीकडे हँडसम ह-या, शेजारी मी, माझ्या शेजारी सम्या शेख’ इती पश्या कुलकर्णी.

सगळेजण उत्साहाने फोटोत आपण कुठे आहोत हे अहमहिकेने सांगत होते.

तेवढ्यात प्रल्ह्या म्हणजे प्रल्हाद ढवळेला माझी आठवण झाली..
‘अरे सुन्या कुठाय..सहावीपर्यंत होता की तो शाळेत…!!’

मी आतापर्यंत सगळी गंमत पहात होतो.
आता मैदानात उतरणे भाग होतं..
‘ भावानो..नीट बघा निलम टिचरच्या मागे विकी..त्याच्या बाजूला सरदार पम्मी..त्याच्याशेजारी मी आहे…’ आणि हळूच त्यात जोडलं
‘अपूर्वाच्या बरोबर मागे..’

अपूर्वाचे नाव निघताच सगळीकडे ‘हाय..हाय..यार..नको आठवण करुन देउस’ असा सूर उमटला..

अपूर्वा चिटणीस आमच्या वर्गाची ‘ब्युटी क्वीन’ आणि ‘दिलों की धडकन’..
तिचे नाव निघताच गृप मधे आग लागली..
‘आज भी क्या दिखती है यार..अजून काटा आहे..’ अशा टिप्पणी झाल्या.
अपूर्वाबरोबर मग आपआपल्या ‘क्रश’ सर्वांना आठवल्या.
अठरा मुली होती वर्गात.
कोण कुठे आहे..काय करतेय..कुठल्या देशात व शहरात राहतेय..
सगळे बायोडेटा पटापट अपडेट झाले..

शाळेतल्या मुलींचही काहिसं हापूस आंब्यासरखं असतं..
सगळ्यात चांगल्या प्रतीचे असतात ते परदेशात जातात..
तसेच जास्तीत जास्त सुंदर व हुशार मुली US किंवा UK मधे असतात
आमच्याकडे अपूर्वा, राधा, अनुश्री, निशा या त्यात मोडणा-या..

बाकीच्या मुली पुण्यातच जास्त नाहीतर गेलाबाजार मुंबईत सापडतात..
केतकी, मनीषा, वर्षा, डाॕली, अस्मीता, शबाना, इत्यादी अनेक मुली पुण्या मुंबईत स्थायीक..
म्हणजे माझ्या कडेही काही वेगळं नसतं..
पुण्याला नोकरी करतोय व स्वतःच घर आहे यातच आम्ही मुले निम्मी बाजी मारुन गेलो होतो..

मुलींबद्दलचे हे सर्व ज्ञान उजळनी करताना अचानक सच्या पाटील ने टाकलं..
‘ ए..ती पहिल्या रांगेतली टिचर शेजारी..गालावर डाग..ती अश्विनी आहे ना?
ती कुठे असते रे…एनी अपडेटस..?’

अश्विनी हे नाव निघताच गृपवर एकदम शांतता पसरली…
एक मिनीटभर कुणीच काही लिहायला तयार नाही..

मग गजाने काॕमेंट टाकली ‘इतना सन्नाटा क्यों है भाई?’
मी हसत वाट बघत होतो..कोण लिड घेतय या विषयात..
विज्या देशमुखने शेवटी कोंडी फोडली…
‘अश्विनी बद्ल काही अपडेट असेल तर ते सुन्याकडेच असू शकेल…’

अश्विनी च्या नावा सोबत माझा उल्लेख झाला अन मी तीस वर्षे मागे गेलो..

अश्विनी साठे पाचवीला आमच्या क्लासमधे म्हणजे 5th B मधे आली.
गोरी पान, किंचीत घारे डोळे, रिबिन बांधून केलेल्या दोन छान वेण्या..
युनीफाॕर्म नेहमी स्वच्छ, कडक इस्त्रीचा, तसाच टाय..व काळे पाॕलीश्ड शूज.
अश्विनी दिसण्यात कुठेच अपूर्वापेक्षा तसुभरही कमी नव्हती…पण.
पण…तिच्या डाव्या गालावर तो भाजल्याचा व्रण होता..
एक रुपयाच्या जुन्या नाण्यापेक्षा थोडा मोठा हा व्रण..
तिच्या निरागस सौंदर्याला लागलेले ग्रहणच होते जणू..

आल्या दिवसापासून सर्व मुली अश्विनी पासून दूरच रहात होत्या..
त्या बाल वयात तेवढी मॕच्युरुटी नसते ‘व्रण’ व ‘कोड’ यातला फरक समजण्याची..
मग दोन चार दिवसात शाळेतल्या काही मुलांकडून चिडवणं सुरु झालं..
‘ए…झिनत अमान…’ असे 5th D चा सु-या म्हणजे सुरेश काटकर तिला चिडवत होता.
आधी मला कळले नाही..झिनत आमान का?
मग सच्या पाटलाने सांगितली ‘सत्यम शिवम’ ची स्टोरी..अन उलगडा झाला..
माझा संताप संताप झाला…पण गप्प बसलो…
तोवर अश्विनी एकटीच पहिल्या बेंचवर बसत होती..

आठ दिवसानंतर एक किस्सा झाला..
सु-याने टिफीन ब्रेक मधे अश्विनीला परत काहीतरी हिणवलं..
ती रडत रडत वर्गात येउन तोंड खाली घेउन रडू लागली…
मी डबा खात होतो..
तडक उडलो…
ग्राउंडवर सु-या जेवायला बसला होता.त्याच्या मित्रांसोबत..
त्याला काॕलर पकडून उभा केला अन दिली एक कानाखाली सनकावून…
सु-या आणि पोरं माझ्या अंगावर…मी खाली ते वर…
तेवढ्यात माझी दोस्त मंडळी धावत आली..व आम्हाला बाजूला केलं..
मागोमाग अश्विनी देखील आली..
आमची 5th B ची पोरं सु-याच्या गँगला कधीपण भारी होती..
सु-याने माघार घेतली…
मी बोलल्याप्रमाणे अश्विनीला साॕरी बोलून तो तिथून डबा घेउन निघून गेला..
त्या दिवसानंतर अश्विनीला चिडवायची कुणाची हिम्मत नाही झाली..

मधल्या सुट्टीनंतर अश्विनी सरळ माझ्या शेजारी येउन बसली..
सगळीजण एकमेकांकडे पहात होते…
कुणी काही बोललं नाही…
त्या दिवसापासून सातवीला मी शाळा सोडेपर्यंत अश्विनी मधल्या रांगेतल्या त्या तिस-या बाकावर माझ्या शेजारीच बसत होती…

क्रमशः
©सुनील गोबुरे

About Sunil Gobure 13 Articles
I am a Banking Professional, working currently with ICICI Bank Ltd. Basically an Engineer by education, I entered into Banking field in middle of my career. Since 2006 I am working with ICICI Bank. Currently posted at Sangli, taking care of Kolhapur Region as Regional Sales Manager for Business Loans Group.