शेवटची इच्छा

बेडवर झोपलेल्या वत्सलाबाईंनी अशोकरावांना आवाज दिला..
‘अहो…’
अशोकराव बाजूलाच टेबलवर काही लिहीत बसले होते..
‘वत्सला..काय गं..काही हवय? पाणी देउ..?’
‘नको..काही नको..तुम्ही माझ्याजवळ येउन बसा ना..’
अशोकराव चटकन उठले व एक खुर्ची घेउन वत्सलाबाईंच्या शेजारी येउन बसले..

वत्सलाबाईंनी थरथरत आपला हात पुढे केला. अशोकरावांनी तो हात त्यांच्या दोन्ही हातामधे घेतला व एकदा थोपटला.

त्यांनी प्रेमाने विचारले..
‘बोल वत्सला…काय सांगायचय…काही शाळेतलं प्रेम वगैरे आठवलं का? कन्फेशन करायचय?’

वत्सलाबाईंनी लटक्या रागाने आपल्या पतीकडे पाहिले..
‘काय हो..कधीही विनोद सुचतो तुम्हाला..’

अशोकराव हसले व म्हणाले
‘बरं..बोल..काय सांगायचय..?’

वत्सलाबाई प्रेमाने त्यांच्याकडे पहात बोलल्या..
‘फार केलंत तुम्ही माझं….दहा वर्षे काही ना काही कारणाने आजारपण, दवाखाने, आॕपरेशन, औषध पाणी, पथ्य..’

‘वत्सला…!.’ तिला मधेच अडवत अशोकराव बोलले
‘आपलं ठरलय ना याबद्दल बोलायचं नाही म्हणून…? अगं तरुणपणात माझा अॕक्सिडेंट झाला होता तेंव्हा असंच दोन महिने माझं सारे केलं होतस ना तु ही? शाळेतून सुट्टी टाकून केलस माझं तेंव्हा..नोकरीवर गंडांतर येता येता राहिलं तुझ्या. मग मी आता तुझ्या आजारपणात करतोय तर काय मोठं एवढं? शिवाय माझ्यापेक्षा तारा मावशीच तुझी सेवा करतात..मी फक्त देखरेख करतो..म्हणजे तू मला सोडून, यमराजाचा हात धरुन पळून जाउ नयेस म्हणून..’

अशोकराव स्वतःच्या विनोदावर हसले. वत्सलाबाईंच्या चेह-यावरही मंद स्मित उमटले. अशोकरावांचा हा गमत्या स्वभाव अगदी तरुण वयापासूनचा. कोणत्याही गंभीर प्रसंगात विनोद करुन प्रसंग हलका करण्याची त्यांच्याकडे हातोटी होती.

अशोकराव वत्सलाबाईंचा हात छातीशी धरत पुढे म्हणाले
‘त्यात देखील आम्ही पुरुष लोक स्वार्थीच गं वत्सला.. दिमतीला जन्मभर बायको हवी..मग तिच्यामागे जमतच नाही पुरुषांना..! मग काय? बायको गेली की पाठोपाठ आम्हीही एक्झीट घेतो. नरकातून मधेमधे स्वर्गात जाउन बायकोला भेटता तरी येतं ना..’

अशोकराव हसले..पण हसता हसता त्यांचा चेहरा गंभीर व आवाज कापरा झाला..
‘वत्सला, वयाची सत्तरी आलीय..आपलं सगळं जगून झालय..तू रिटायर होईस्तोवर तुझी तब्येत ठणठणीत होती तोवर देश आणि परदेशात फिरुन आलो..मनसोक्त जगलो आपण..मुले आपल्या मार्गाला लागली..जरा लांब गेली आहेत पण अजून मनाने जवळ आहेत हेही नसे थोडके.. वत्सु…आता तुझ्याशिवाय जीवनाला कोणता उद्देशच उरला नाहीय. तुझ्यानंतर जगायची कल्पनाच करु शकत नाही. तू गेलीस की थोड्या दिवसात मी सुद्धा येणार तुझ्या पाठोपाठ..’

वत्सलाबाईंनी हात सोडवून अशोकरावांच्या तोंडावर हात ठेवला..
‘असं अभद्र बोलू नका बाई. .देवाने ठणठणीत प्रकृती दिलीय तुम्हाला. कथा कविता किती छान लिहीता..! सगळेजण नावाजतात..आता कादंबरी लिहीताय ती तुम्हाला पूर्ण करुन प्रकाशीत करायचीय..माझं आयुष्याचं माप संपत आलय. तुम्हाला अजून खूप लिहायचय..खूप जगायचय…म्हणूनच एक विनंती आहे तुम्हाला..’

‘आता काय विनंती करणार आहेस..आयुष्यभर तुझा शब्द पडू दिला नाही..बिवी का गुलाम बनून राहिलो..’

वत्सलाबाईंनी त्यांच्या हातावर प्रेमाने हळूच चापटी मारली.
‘जरा गंभीरपणे ऐका..मी काय बोलतेय..मी आहे तोवर आहेच..पण…’ अशोकरावांच्या डोळ्यात खोल पहात त्या बोलत होत्या..’पण समजा उद्या नसेन तर तुम्ही माझ्यात अडकून पडू नका..आपली उजू देखील एकटी पडलीय दिनकर गेल्यापासून..तिलाही लेखना वाचनाची आवड आहे..तुमचं छान जमेल. दोघे मिळून आजून पंधरा वीस वर्षे नक्की काढाल..तोवर तुमची पुस्तके प्रकाशीत करा..आपली बघायची राहिलेली ठिकाणे पहा..तुमच्या डायरीत लिहा सारे..मी गुपचूप येउन वाचून जाईन. तुम्ही माझ्यानंतर उज्वलाशी लग्न करुन तिला पुण्याहून इथे नाशकात घेउन या..दोघांना सोबत होईल. तुम्ही दोघे इथे आनंदात असाल तर माझ्या आत्म्याला समाधान होईल. प्लीज नाही म्हणू नका..ही माझी शेवटची इच्छा आहे असे समजा..’

वत्सलाबाई बोलत असताना आशोकरावांचे डोळे झरझर वहात होते. त्यांचा हात पकडून आपल्या ओठाशी नेत हाताचे चुंबन घेत ते बोलले..
‘वत्सु..अशी निरवानिरवीची भाषा बोलू नकोस ग..! मला तू अजून हवी आहेस..बघ माझी कादंबरी अर्धी लिहून झालीय..ती पूर्ण होईपर्यंत तू मला टाकून जाउ शकत नाहीस. माझी पहिली समिक्षक तुच आहेस ना..शिवाय ही माझी अर्धवट झालेली कादंबरी वाचून दाखवायचीय तुला…’

वत्सलाबाई मंद हसल्या..
‘मला आधी शब्द द्या..तुमचा काय भरवसा..मला गुंतवून ठेवाल कादंबरीच्या नावाखाली..’

‘दिला ग बाई शब्द..तुला नाही म्हंटलय का आयुष्यात..? शेवटी काय बायकोपेक्षा मेहुणी बरी..आताच आणू का उज्वलाला लग्न करुन? दोन बायका फजीती ऐका हा सिनेमा चालू करुयात घरी..’
अशोकराव डोळे पुसत म्हणाले

वत्सलाबाई हसत म्हणाल्या..
‘ कादंबरी वाचून दाखवताय ना मला..?’

‘हो ग बाई..पण काही चुकलं बिकलं असेल तर ओरडू नको हां..! मास्तरीण होतीस..लिखाणात चुका काढायची सवय आहे तुला..’

दोघेही मनमोकळे हसले..
अशोकराव त्यांची अर्धीमुर्धी कादंबरी वाचू लागले..
ऐकता ऐकता वत्सलाबाईंचा डोळा लागला..

त्यांच्या चेह-यावर झोपेत आज समाधानाचे हसू फुलले होते.

© सुनील गोबुरे

About Sunil Gobure 13 Articles
I am a Banking Professional, working currently with ICICI Bank Ltd. Basically an Engineer by education, I entered into Banking field in middle of my career. Since 2006 I am working with ICICI Bank. Currently posted at Sangli, taking care of Kolhapur Region as Regional Sales Manager for Business Loans Group.