डाउन बट नाॕट आउट

‘डाउन बट नाॕट आउट’

प्रसादचा फोन वाजला. त्याचा जवळचा मित्र, राकेशचा फोन होता. प्रसाद एका मिटींगसाठी काॕन्फरन्स रुममधे शिरणारच होता. घ्यावा की नको म्हणत त्याने फोन घेतला..
‘हॕलो राकेश..बोल..’
‘प्रसाद..बिझी आहेस का रे?’
‘हो रे मित्रा..काही अर्जंट नसेल तर नंतर फोन करतो..एका मिटींगमधे शिरतोय..’
‘ओ. के..फक्त संध्याकाळी घरी भेटशील का..? एक महत्वाचे बोलायचय..’
‘ओ.के..’ प्रसाद म्हणाला..’आठ नंतर कधीही ये..मी घरीच असेन’
‘डन..!’ राकेशने समारोप केला ‘आठपर्यंत पोचतो तुझ्याकडे..’

प्रसाद एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत फायनान्स हेड होता. दिवसभर वेगवेगळ्या मिटींग्जमधे त्याचा वेळ जायचा. त्यामुळे रुटीन काम संपवायला ब-याच वेळेला संध्याकाळी उशीरपर्यंत आॕफीसमधे बसायचा. घरी पोहोचेपर्यंत ब-याच वेळा नउ वाजायचे.

आज मात्र राकेश येणार आहे हे लक्षात ठेउन तो सातलाच आॕफीसमधून निघाला. आॕफीस ते घर हे अंतर फक्त पंधरा मिनीटेच.. पण पुण्याच्या संध्याकाळच्या ट्रॕफीकमधून पोहोचायला पाउणतास सहज लागायचे.

घरी पोचल्यावर दरवाजा उघडलेल्या सरला मावशींना तो म्हणाला
‘ मावशी..उर्वी कुठे आहे…’
‘तिच्या रुममदी हाय..चित्रं काढतीया..’
‘बरं..काढू दे तिला..मी आवरुन येतो’..मग काही आठवून तो म्हणाला ‘माझा एक मित्र येतोय घरी..आम्हाला पाच सहा अंडी बाॕइल करुन ठेवा..स्वयपाक बनवलाय ना?’
‘व्हय तयार केलाय की..’
‘मग उर्वीला जेवायला ताट करा..ती खातेय का बघा..नाहीतर मी भरवेन तिला..आलो मी आवरुन..मी आल्यावर तुम्ही गेलात तर चालेल’ असे म्हणत प्रसाद आवरायला निघून गेला.

तो फ्रेश होउन आवरुन आला. सरला मावशी उर्वीला जेवण भरवून घरी गेल्या. तोवर राकेशही पोचला.

राकेश त्याचा काॕलेजमधला मित्र. अकरावी ते बी.काॕम दोघे एकत्र होते. प्रसाद अंगभूत हुशारीवर सी.ए. झाला. राकेश बँकेची परिक्षा देत एका नावाजलेल्या सहकारी बँकेत लागला.
प्रसादची आर्थिक स्थिती बरीच चांगली होती राकेशपेक्षा.. पण त्यांची मैत्री घट्ट होती.

प्रसादची पत्नी,उत्तरा,सहा महिन्यापूर्वी ब्रेन ट्यूमरने वारली होती. आधी काही कल्पना नसताना अचानक त्रास सुरु झाला. डाॕक्टरांनी सुरवातीला मायग्रेन समजून औषधे दिली. दोन महिन्यात आजार बळावला आणि तिला अॕडमिट करावे लागले. सर्व टेस्टस केले तेंव्हा तो ट्यूमर आहे व एव्हाना दुस-या स्टेजला आहे असा निष्कर्ष निघाला. डाॕक्टरांनी आॕपरेशनचा सल्ला दिला. आॕपरेशनची तारीख दोन दिवसांवर असतानाच उत्तरा अचानक हे जग सोडून निघून गेली..घरीच..झोपेत.. मागे प्रसादवर जबाबदारी टाकून गेली.. उर्वीची..!

उर्वीला ‘डाउन सिंड्रोम’ होता.
लहाणपणी जेंव्हा तिचा चेहरा बदलून तिने ‘मंगोलीयन फेस’ धारण केला तेंव्हाच प्रसाद व उत्तरा खचून गेले. पण मग हळूहळू त्यांनी ह्या सत्याचा स्विकार केला. उर्वी नंतर मूल होउ न देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. उत्तरा ने तिची नोकरी सोडून उर्वीला पूर्ण वाहून घेतलं.

उर्वी आता नुकती बारा वर्षाची झाली होती आणि दैवाने हा दुसरा घाला प्रसादवर घातला होता..उत्तराच्या मृत्युने तो पूर्ण कोलमडून गेला होता. त्यावेळी राकेश व त्याची पत्नी सवीता दोघांनी त्याला खूप मानसीक आधार दिला होता. अनेक दिवस प्रसाद विमनस्कपणे घरी बसून राहिला होता. तेंव्हा रोज राकेश आणि सवीता संध्याकाळी येउन त्याला भेटत..त्याला समजावत. उर्वी करिता त्याला हिंमत करुन आयुष्याला सामोरे जाणे कसे आवश्यक आहे हे सांगत.

हळू हळू प्रसाद सावरला. आॕफीसला जाउ लागला. नशिबाने सरला मावशीसारख्या चांगली प्रौढा त्याला उर्वीची काळजी घेण्यासाठी मिळाली होती.

राकेश आल्यावर उर्वीचा चेहरा खुलला..तो तिचा आवडता काका.
‘काक्का…मळा भेटायडा का येज नाईस..?’
उर्वीचे शब्दोच्चार स्पष्ट नव्हते..तिच्याशी नव्याने बोलणा-याला तिचे बोलणे समजायचे नाहीच. फक्त तिच्या डॕडू आणि आईला समजायचे व सहवासाने राकेशला थोडं थोडं समजायचं.
‘हो ग उर्वी..साॕरी बरेच दिवस वेळ मिळाला नाही माझ्या या फ्रेंडला भेटायला..?’
‘गर्डफ्रेंड..?’ असे म्हणत ती मोठ्याने हसली..
राकेशने तिचा हात धरत म्हंटलं..
‘हो तर..तू माझी गर्लफ्रेंडच आहेस..एकूलती एक..’
‘गर्डफ्रेंड..ओ गाॕड..’ असे म्हणत तिने तोंडावर हात धरला व पुन्हा हसली.
‘सवी काक्कू का नाही आडली?’
‘अगं उर्वी तुझी सवीकाकू येणार होती पण रुद्रची उद्या परिक्षा आहे ना म्हणून त्याचा अभ्यास घेतेय..तिला मी पुन्हा घेउन येतो हं..’
‘सवी काक्कू..घेउन ये..मडा आवडडते..’
‘हो आणि सवी काकूलाही खूप आवडते बरं आमची उर्वी..’

प्रसादने उर्वीला म्हंटलं..
‘उर्वू..चला आता निजनिज करायची वेळ झाली..मम्मम झालय..आता निजनिज करायचं..चल बरं..काकाला गुडनाईट कर..”
‘काक्का..गुड्ड नाईस..!’ असे म्हणत उर्वी बेडरुमकडे गेली.

उर्वीला तिच्या खोलीत बेडवर झोपवून तिचे एक आवडते गोष्टीचे पुस्तक तिच्या हाती देउन प्रसादने दरवाजा लावून घेतला.

बाहेर येत तो राकेशला बोलला..
‘राक्या..नाइन्टी नाइन्टी चालेल ना..जाॕनी वाॕकरची गोल्ड लेबल मिळालीय..आमच्या एम.डी. ने सगळ्या टाॕप ब्रासला गिफ्ट केली..परवाच.. मी तुला शनिवारी फोन करणारच होतो..’

‘अरे वा..नक्की चालेल..पण नाइन्टीच घेईन मी पश्या..उद्यापासून माझ्या ब्रँचला आॕडीट आहे यार..उगीच हँगओव्हर नको..’

प्रसाद हसला ‘अरे गोल्ड लेबल आहे ही…बघ पिउन कशी स्मूथ आहे! अजीबात हँग ओव्हर येणार नाही उद्या’

दोघे हाॕलमधेच सोफ्यावर बसले.
प्रसादने दोन पेग बनवले..सरला मावशींनी घरी जाण्याआधी बाॕइल अंडी कापून तिखट मीठ टाकून बाउलमधे ठेवले होते. त्याने तो बाउल समोर ठेवला.

दोघांनी चिअर्स केलं..
प्रसादने राकेशला विचारलं
‘आता बोल काय महत्वाचा विषय बोलणार आहेस?’

राकेशने घसा खाकरला..कशी सुरवात करावी या विचारात असतानाच प्रसाद बोलला
‘राक्या..बिनधास्त बोल रे..जीवनात इतके मोठे धक्के खाललेत..आता कशाचंच काही वाटत नाही..’

राकेश हसला. जे बोलण्यासाठी आला होता ते बोलता झाला..
‘पश्या..वहिनींना जाउन सहा सात महिने झालेत. तू आता आताच त्या धक्क्यातून सावरलाहेस हे आम्हाला माहित आहे..पण तू अजून चाळीशीच्या उंबरठ्यावर आहेस..पुढे मोठं आयुष्य सरायचय तूझं..शिवाय उर्वी..तिला या वयात आई हवी ना रे..तिची मानसीक वाढ कमी असली तरी शरीर तर वाढतं आहेच ना..उद्या तिचे पिरीयड्स सुरु होतील, तिच्यात शारिरीक बदल होतील ते तिला कोण समजावणार? तिला काय करायचं..कसे करायचं हे..सगळं कोण करणार? अगदी खरे सांगायचं तर मी आणि सविता यावर खूप डिस्कशन करतो..टेन्शन येतं रे त्या पोरीचा विचार करुन..तू म्हणशील उर्वी माझी मुलगी आहे मी काळजी घेईन..पण मुलींच्या..स्त्रीयांच्या बाबतीत काही खाजगी गोष्टी असतात रे..ते एक पुरुष म्हणून किंवा बाप म्हणून तू कशा मॕनेज करशील..? या गोष्टींचा विचार करायची वेळ आलीय असं तूला वाटत नाही का?

व्हिस्कीचा एक घोट घेत प्रसादने राकेशकडे पाहिले. मग त्याने स्माईल केलं..
‘साला लेखक व्हायचास तू राक्या..चुकून बँकेत लागलास..पार्श्वभूमी उभी केलीस बरोबर..आता कम टू द पाॕइंट..’

राकेश ने त्याचा पेग उचलला. काचेतून चमकणा-या व्हिस्कीच्या त्या सोनेरी रंगाकडे पहात तो म्हणाला..
‘ठीक आहे..मुद्द्याचच बोलतो…प्रसाद आय फिल.. यू शूड थिंक आॕफ रिमॕरेज! रागावू नकोस..पण हे माझं आणि सवीचं खूप डिस्कशन्स नंतर मत झालय… हे बघ पशा…उत्तरा वहिनीची जागा कोणीच घेउ शकणार हे सत्य निर्विवाद आहे..पण मित्रा लाइफ इज क्रुअल..अँड यू नीड अ पार्टनर…उर्वीला आईची गरज आहे..आत्ता..तुलाही लाइफ पार्टनरची गरज आहे.. संध्याकाळी घरी आल्यावर कोणाबरोबर तरी लाईफ शेअर करावंसं वाटत असणार ना यार तुला..? सोफ्यावर बरोबर बसून बोलायला, हसायला, आपलं एक माणूस हवं ना रे..? कमी असतील पण तुझ्याही शरीराच्या गरजा आहेत ना..सेक्सुअल डिझायर्स कान्ट बी सप्रेस्ड फाॕर लाँग..! सर्वात महत्वाचे म्हणजे उर्वीला मोठं करताना तुला बळ हवं..उर्जा हवी..मोटीवेशन हवं..ह्या सर्वांची तुला गरज आहे..लागेल..उर्वीला मोठी करेपर्यंत..’

आपला उरलेला पेग राकेशने एका दमात संपवला. त्याने प्रसादकडे पाहिले. प्रसादच्या गालावर स्मित होतं..
‘बोल..बोल..मी ऐकतोय..’ तो म्हणाला.

राकेशना अंड्याचा एक काप तोंडात टाकला व म्हणाला
‘प्रसाद..बँकेत माझ्या ब्रँचला दोन महिने झाले एक स्टाफ आलीय..शर्मीला तिचं नाव..वय साधारण छत्तीस..तिचा नवरा गेला एक वर्षापूर्वी..कॕन्सरने. तिलाही एक मुलगी आहे आठ वर्षाची. ती रिमॕरेजसाठी स्थळे बघतेय..साॕरी पशा..पण तुझ्या परवानगी शिवाय मी तिला तुझ्याविषयी बोललो..तिची तुला भेटायची तयारी आहे..आय नो लूक्स डोंट मॕटर..पण ती देखणी आहे.. स्वभावानेही खूप प्रेमळ आहे..तिचा नवरा ठाण्याला होता..पुण्यात माहेर म्हणून पुण्यात बदली करुन घेतलीय..सध्या भाड्याने राहतेय..इंडिंपेंडटली..! हे बघ..मी काही प्रोफेशनल मॕचमेकर नाहीय..पण मला व सवीला वाटतं तुम्ही दोघे अनुरुप आहात..तुम्ही नक्की एकमेकांना व मुलांना सांभाळून घ्याल. काय म्हणतोस?’

प्रसाद बराच वेळ काही बोलला नाही.
बाजूच्या टेबलवरचा फ्लाॕवर पाॕट त्याने उचलला. त्यावर तो, उत्तरा व उर्वी यांचे वेगवेगळे फोटो उत्तराने हौसेने प्रिंट करुन घेतले होते. तो त्या वेगवेगळ्या फोटोंना न्याहाळत होता.

आपला पेग संपवून त्याने खाली ठेवला व सावकाश म्हणाला
‘राक्या..थँक्स मित्रा..तू व सवी नसता तर मी आज काय अवस्थेत असतो मला ठाउक नाही..तुम्ही दोघांनी मला डिप्रेशन मधून बाहेर आणलत, उत्तरा गेल्यानंतर. मी यासाठी कायम तुमच्या ऋणात राहीन. शिवाय तू व सवी जी खटपट करताय, हे स्थळ वगैरे, हेही मला पटतय..तुझ्या जागी मी असतो तर कदाचित हेच केलं असतं. आय रिअली अॕप्रिशियेट युवर गेश्चर…!’

प्रसादने एक निश्वास टाकला. स्वतःसाठी व राकेशसाठी दुसरा पेग बनवत तो पुढे म्हणाला
‘कसं आहे ना राक्या..तू म्हणालास तसं रिमॕरेजने माझी सोय होईल..मला इमोशनल पार्टनर मिळेल..पोटाची हक्काची सोय होईल..अँड यस.. माय सेक्शुअल निड्स विल भी टेकन केअर आॕफ..!! पण राकेश तुला एक सांगू..उत्तरा गेल्यानंतर ब-याचदा मला सुसाइड करायचा विचार येउन गेला. कारण उर्वीला कितीही समजून सांगीतलं तरी ती समजत नव्हती ना रे..सारखी हट्ट करायची..आदळआपट करायची..वस्तू फेकायची..मला आई पाहिजे असा सतत घोषा लावायची. तूही पाहिलीहेस तिची ती अवस्था त्यवेळी..! . मला ते सगळं असह्य व्हायचं.. मी शेवटी एकदा उर्वीच्या थोबाडीत दिली…जोरात. पोरगी कळवळली रे..माझी बोटे उमटली तिच्या गालावर..माझाही बांध फुटला..मी तिला जवळ घेउन बराच वेळ रडत होतो..’

घशात आलेला अवंढा एक सिप मारत प्रसादने आत ढकलला.
‘तुला ठाउक आहे तेंव्हा उर्वी काय बोलली? “डॕडू..तू रडू नकोस..मी परत आईसाठी हट्ट करणार नाही”. आणि आज या गोष्टीला चार महिने झालेत. तिने परत आई हा शब्दही काढला नाही रे तोंडातून.. माझी पोरगी..बारा वर्षाची..जिला जग मेन्टली रिटार्डेड म्हणतं..तिने मला त्यादिवशी समजून घेतलं..माझे डोळे पुसले..त्या दिवशी ‘ती’ माझी आई झाली..’
प्रसादच्या डोळ्यातून अश्रु ओघळत होते..
राकेशने समजून घेत त्याचा हात धरला व थोपटला.

‘ज्यादिवशी मी स्वतःला अगदी संपवणार होतो त्यादिवशी उर्वीने मला उर्मी दिली..मला जगण्यासाठी एक गोल दिला. राक्या..मी ठरवलय..आता मी फक्त उर्वीसाठी जगणार आहे. तिच्यासाठी जगणे हेच उद्दीष्ट, हेच माझे ध्येय. मी आता सगळं माहित करुन घेतोय.. तिचे येउ घातलेले पिरीयड्स..तिच्यातले बदल..तिच्या खाण्या पिण्याच्या गरजा, हे सर्व ती जाते त्या शाळेतल्या शिक्षीका खूप छान समजून सांगतात..तिला व मलाही. मी मनाची तयारी करतोय..माझी व उर्वीचीही..!’

पुन्हा एक सिप घेत प्रसाद पुढे एका ट्रान्समधे जात बोलला
‘माझ्या स्वतःच्या गरजा मी उत्तराच्या चितेत जाळून टाकल्या राकेश. आय हॕव नो ओन निड्स नाउ..! माझी फक्त देवाला एकच प्रार्थना आहे. उर्वीला जेवढं आयुष्य देशील त्यावर फक्त एक दिवस जास्त आयुष्य मला दे..तिला अलविदा करीन आणि मी माझेही मरण हसत स्विकारेन.’

आता राकेशचे डोळेही भारुन आले. तो म्हणाला
‘पण प्रसाद हा प्रवास खूप खडतर आणि एकाकी आहे..’

प्रसाद हसला व म्हणाला..
‘मला कल्पना आहे त्याची. मागच्या महिन्यात डाउन सिंड्रोमवर एक पालकांची कार्यशाळा मी अटेण्ड केली..त्याची थिम होती ‘वी आर डाउन, बट नाॕट आउट’.

मी जीवनाशी दोन हात करायची तयारी केलीय राक्या..मी ही लढाई लढणार आहे..माझ्या उर्वीसाठी.’

प्रसादने भिंतीवरच्या उत्तराच्या फोटोकडे पाहिले व म्हणाला..
‘आय अॕम शुअर..उत्तरालाही हा माझा निर्णय मान्य असेल..!!’

© सुनील गोबुरे

About Sunil Gobure 13 Articles
I am a Banking Professional, working currently with ICICI Bank Ltd. Basically an Engineer by education, I entered into Banking field in middle of my career. Since 2006 I am working with ICICI Bank. Currently posted at Sangli, taking care of Kolhapur Region as Regional Sales Manager for Business Loans Group.